Home बातम्या कोणता गट सत्तेसाठी पलटी मारणार? ‘मी पुन्हा येईन’ वेब सीरिजचे पुढील 3 भाग प्रेक्षकांच्या भेटीला

कोणता गट सत्तेसाठी पलटी मारणार? ‘मी पुन्हा येईन’ वेब सीरिजचे पुढील 3 भाग प्रेक्षकांच्या भेटीला

राजकारणातील साधारण परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारी प्लॅनेट मराठीची नवी वेब सीरिज ‘मी पुन्हा येईन’ गेल्या आठवड्यात प्रदर्शित करण्यात आली होती. लक्षवेधी नाव असलेल्या या सीरिजचे तेव्हा पहिले तीन एपिसोड रिलीज करण्यात आले होते. या पहिल्या तीन भागांमध्ये उपेंद्र लिमये आणि सयाजी शिंदे यांनी धुमाकूळ घातला होता. आणि तेव्हा पासूनच वेब सीरिजच्या पुढील भागांविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. आता पुढील तीन भाग 5 ऑगस्ट दुपारी 4 वाजल्यापासून प्लॅनेट मराठीवर उपलब्ध झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी मी पुन्हा येईन या वेब सीरिजचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. यात विनोदवीर भारत गणेशपुरे प्रमुख भूमिकेत आहे. सोबतीला उपेंद्र लिमये आणि सयाजी शिंदे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. तसेच या सीरिजमध्ये सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांनी देखील रंगत आणली आहे.

‘मी पुन्हा येईन’ च्या पहिल्या तीन एपिसोड्समध्ये सत्तेसाठी पक्ष वरिष्ठांना विनवण्या, सत्तानाट्य, मंत्रीपदासाठी राजकारण्यांची कुरघोडी, आमदारांची पळवापळवी हे सर्व विनोदी शैलीत दाखवण्यात आले आहे. तर आता सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी दिवटे आणि विरोधी पक्षनेते मुरकुटे कशाप्रकारे अपक्ष आमदारांची पळवापळवी करतात, पाहायला मिळणार आहे.

आमदारांची पळवापळवीला विरोधी पक्षनेते मुरकुटेंनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुरुवात केली आहे. यासाठी आमदारांना रिसॅार्टवर नेण्यात आले आहे. परंतु तिथेही आमदारांना कसे फोडतात हे पाहायला मिळेल. अपक्ष आमदार सत्ताधारी विनायक दिवटेंच्या गटात सामील होणार का? कोण दगाबाजी करणार? कोणता गट सत्तेसाठी पलटीमारणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना नवीन एपिसोड्समधील मिळतील.

वेब सीरिजविषयी सांगताना लेखक दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणले की, “महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाशी या सीरिजचा काहीही संबंध नाही. या मालिकेची निर्मिती निव्वळ मनोरंजनाच्या हेतूनं करण्यात आली आहे. राजकीय घटनांच्या पडद्यामागे काय घडतं हे या या निमित्ताने प्रेक्षकांना समजेल.” प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “या वेब सीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरून सकारात्मक प्रतिक्रिया येत असून पुढील भागही लवकर प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे. पहिल्या तीन भागांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता पुढचे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.”