OnePlus यंदा भारतात 6 स्मार्टफोन लाँच करणार असल्याची बातमी यावर्षीच्या सुरुवातीला आली होती. वर्षभरात मोजकेच मॉडेल सादर करणारा ब्रँड आता फ्लॅगशिपसह बजेट आणि मिडरेंजमध्ये देखील शिरकाव करत आहे. कालच कंपनीनं भारतासह जागतिक बाजारात OnePlus 10T 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. यात क्वॉलकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 150W फास्ट चार्जिंग असे हायएंड फीचर्स मिळतात. परंतु वनप्लसनं आणखी एक स्मार्टफोन गुपचूप लाँच केला आहे. परवडणाऱ्या किंमतीत OnePlus Nord 20 SE ची एंट्री झाली आहे.
वनप्लसचा हा नवीन स्मार्टफोन नॉर्ड सीरीजमध्ये सादर करण्यात आला आहे. वनप्लसनं AliExpress वर आपला बजेट स्मार्टफोन OnePlus Nord 20 SE लाँच केला आहे. वनप्लसचा हा फोन सध्या AliExpress वरून विकत घेता येईल. लेटेस्ट Nord 20 SE स्मार्टफोन मीडियाटेकच्या दमदार प्रोसेसरसह बजेट सेगमेंट सादर केला गेला आहे. पुढे आम्ही तुम्हाला OnePlus Nord 20 SE स्मार्टफोनच्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि अन्य फीचर्सची माहिती दिली आहे.
OnePlus Nord 20 SE चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर
OnePlus Nord 20 SE स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात फ्रंट कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच मिळत . वनप्लसच्या लेटेस्ट Nord 20 SE स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले आणि 720×1612 पिक्सल रिजोल्यूशन देण्यात आलं आहे. फोनची ब्राईटनेस 600 निट्स आहे.
या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगचे काम करतो. OnePlus Nord 20 SE स्मार्टफोनच्या मागे ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा सेंसर आहे, जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. फोनमध्ये LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे.
OnePlus Nord 20 SE स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. OnePlus च्या या फोनमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे. हा फोन Android 12 आधारित OxygenOS 12.1 वर चालतो.
पावर बॅकअपसाठी OnePlus Nord 20 SE मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळते, जी 33W SuperVOOC चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, AI फेस अनलॉक, USB Type-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक आणि ड्युअल स्पिकर देखील आहेत.
OnePlus Nord 20 SE ची किंमत
OnePlus Nord 20 SE स्मार्टफोन AliExpress वेबसाईटवर 199 डॉलर (सुमारे 15,800 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. वनप्लसचा हा फोन 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजच्या एकमेव व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं Nord 20 SE स्मार्टफोनचे ब्लॅक आणि ब्लू असे दोन कलर ऑप्शन उपलब्ध केले आहेत. Nord 20 SE स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची मात्र अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही.
