Home बातम्या ॲमेझॉन बॉक्स उघडताच बसला धक्का, बॉक्समध्ये जिवंत साप आढळला! पाहा व्हिडिओ

ॲमेझॉन बॉक्स उघडताच बसला धक्का, बॉक्समध्ये जिवंत साप आढळला! पाहा व्हिडिओ

ऑनलाईन शॉपिंगमध्ये विविध प्रकारची फसवणूक होत असते. अशा बातम्या सतत समोर येत असतात की, शॉपिंग साईटवरून काहीतरी ऑर्डर केले गेले होते, परंतु जे पार्सल घरी आले त्यावेळी त्यात वेगळीच वस्तू होती. चुकीच्या किंवा खराब झालेल्या वस्तू डिलिव्हर केल्या जात असल्याच्या घटना सातत्याने घडतच असतात. पण आज जे काही समोर आले आहे, ते खरोखरच हृदयद्रावक आहे. कर्नाटकातील एका मुलीच्या ॲमेझॉन बॉक्समध्ये जिवंत साप सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पार्सलमध्ये साप

ही धक्कादायक बातमी बंगळुरूमधून समोर आली आहे. तन्वी नावाच्या तरूणीने तिच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर व्हिडिओ शेअर करून या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. तन्वीने सांगितले की, तिने ॲमेझॉनवरून Xbox controller विकत घेतला होता. नियोजित तारखेला या पार्सलची डिलिव्हरी झाली, पण या वस्तू सोबतच तिला मोठा धक्का देखील बसला.

तन्वीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने ॲमेझॉन बॉक्स उघडला तेव्हा तिला धक्काच बसला. त्या पेटीत एक साप होता आणि तोही जिवंत. बॉक्समध्ये साप पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तन्वीने कसेबसे हिंमत करून तो बॉक्स बादलीत टाकला. वरील व्हिडिओमध्ये तुम्ही ॲमेझॉनवरून आलेले पार्सल पाहू शकता, ज्यामध्ये एक साप देखील बसलेला दिसत आहे. आम्हाला सापांचा फारसा अनुभव नाही, पण काही लोक म्हणतात की हा कोब्रा जातीचा साप आहे.

Amazon कंपनीचे उत्तर

ऑनलाईनच्या पार्सलमध्ये साप आढळल्याची घटना जितकी धक्कादायक आहे, तितकीच या प्रकरणावर ॲमेझॉनची प्रतिक्रिया देखील थंड आहे. पीडित मुलीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओवर ॲमेझॉनने अतिशय साधे उत्तर दिले असून, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पार्सलमध्ये सापडलेला साप ही मानवी चूक नसल्याची शक्यता आहे. मात्र तरीही येथील ॲमेझॉन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पॅकेज योग्यरित्या बंद केल्याने, बाहेरील कोणत्याही जीव जंतूंना बॉक्समध्ये प्रवेश करण्यापासून रोखता येते. जे प्रकरण समोर आले आहे, ते खरोखरच कोणाचाही जीवाला धोका निर्माण करू शकते. त्यामुळे या संदर्भात कंपनीने आपल्या कार्यशैलीत आवश्यक बदल करणे आवश्यक आहे.