Home बातम्या युजरचा नंबर ब्लॉक करणं ‘टेलीकॉम’ कंपनीला पडलं महागात; ग्राहकाला 60 हजार रुपयांची नुकसान भरपाई

युजरचा नंबर ब्लॉक करणं ‘टेलीकॉम’ कंपनीला पडलं महागात; ग्राहकाला 60 हजार रुपयांची नुकसान भरपाई

ग्राहकांचं सिम कार्ड ब्लॉक केल्यामुळे आता एका टेलिकॉम ऑपरेटरचा 60 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश तामिळनाडूच्या कंज्यूमर डिस्प्यूट रिड्रेसल कमीशननं मंगळवारी 5 जुलैला दिले आहेत. कंपनीनं विनाकारण आपलं सिम बंद करून दुसऱ्या युजरला नवीन सिम इश्यू केल्याची तक्रार ग्राहकांनं केली होती. तसेच युजरनं कंज्यूमर डिस्प्यूट रिड्रेसल कमीशनला सांगितलं की सिम कार्ड ब्लॉक झाल्यामुळे त्याचे कॉन्टॅक्ट देखील हरवले होते.

ET Telecom च्या रिपोर्टनुसार, तामिळनाडू मधील कुड्डालोर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. तिथल्या जिल्हा कंज्यूमर डिस्प्यूट रिड्रेसल कमीशननं तक्रारदाराच्या अपीलवर कारवाई करत मोबाईल नेटवर्क सर्व्हिस प्रोवाईडरला आदेश दिले आहेत की, त्यांनी ग्राहकाची सर्व्हिस बंद करण्यासाठी 25,000 रुपयांची नुकसान भरपाई दयावी. तसेच, ग्राहकाचे कॉन्टॅक्ट्स गमावल्यामुळे 30,000 रुपयांचा दंड द्यावा आणि खटल्याचा खर्च आणि मानिसक त्रासासाठी 5,000 रुपयांची भरपाई करावी. अशाप्रकारे एकूण 60,000 रुपये टेलिकॉम ऑपरेटरनं ग्राहकाला द्यावे, असा आदेश देण्यात आला आहे.

कंज्यूमर डिस्प्यूट रिड्रेसल कमीशनचे प्रेसिडेंट डी गोपीनाथ आणि सदस्य वी एन पर्थिभन आणि टी कलयारासी यांनी मोबाईल नेटवर्क ऑपरेटरला नुकसान भरपाईची ही रक्कम दोन महिन्याच्या आत देण्याचे आदेश देखील दिले आहेत. ठरलेल्या तारखेला ग्राहकाला नुकसान भरपाई न मिळाल्यास दर साल दर शेकडा 9 या दराने व्याज देखील द्यावं लागेल.

ग्राहकाने ठरविक कालावधीसाठी सिम कार्डचा वापर कॉलिंग, एसएमएस किंवा डेटा वापरण्यासाठी केला नाही तर ते सिम निष्क्रिय होतं. तसेच कंपनीला नंबर बंद करण्याआधी ग्रेस टाइम देखील द्यावा लागतो. तामिळनाडूच्या युजरच्या तक्रारीनुसार टेलीकॉम ऑपरेटरनं ग्राहकाला ग्रेस टाइम दिला नाही आणि सिम ब्लॉक करून तो नंबर दुसऱ्या ग्राहकाच्या नावे केला. त्यानंतर युजरनं रिड्रेसल कमीशनकडे आपली तक्रार केली होती.

कंपनी कधी करू शकते नंबर ब्लॉक?

TRAI च्या नियमावलीनुसार, जर ग्राहकाने आपल्या मोबाईल नंबरवर 90 दिवस कोणताही रिचार्ज केला नसेल आणि इनकमिंग देखील बंद असेल तर असा नंबर टेलिकॉम कंपन्या बंद करू शकतात. तसेच या 90 दिवसांत नंबरवरून कोणताही कॉल करण्यात आलेला नसावा आणि अकाऊंट बॅलन्स 20 रुपयांपेक्षा कमी असावा. परंतु नंबर बंद करण्याआधी टेलीकॉम ऑपरेटरला 15 दिवसांचा ग्रेस टाइम द्यावा लागेल. त्यानंतर कंपनी तो नंबर ब्लॉक करून दुसऱ्या ग्राहकाला इश्यू करू शकते.

इथे जरी कंपनीची चूक आहे, परंतु ग्राहकांनी त्यांच्या सेकंडरी सिम नंबरची देखील काळजी घेतली पाहिजे. दोन महिन्यातून एकदा तरी सेकंडरी नंबरला रिचार्ज करणं आणि त्याचा वापर करून कॉल करणं आवश्यक आहे, त्यामुळे सिम निष्क्रिय होत नाही. तसेच आवश्यक तो अकाऊंट बॅलन्स देखील ठेवावा. जर तुम्हाला सिम कार्डवर सेव्ह केलेले कॉन्टॅक्टस गमवायचे नसतील तर त्यांचा बॅकअप गुगल कॉन्टॅक्टसवर घ्यावा.