स्मार्टफोनच्या रेडिएशन लेव्हलकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; अशी चेक करा तुमच्या फोनची SAR Value

भारतीय जेव्हा नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करतात तेव्हा सर्वप्रथम बजेट ठरवतात. त्या बजेटमध्ये शानदार कॅमेरा, पावरफुल प्रोसेसर, दमदार बॅटरी आणि आकर्षक डिजाईन या गोष्टी बघितल्या जातात आणि मग खरेदी केली जाते. काही लोकांनी सध्या स्मार्टफोन चिनी आहे की नॉन चिनी हे देखील बघण्यास सुरुवात केली आहे. परंतु यात आपण एका अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो जी सर्वांसाठी अतिमहत्वाच्या आहे. आणि ती गोष्ट म्हणजे फोनची SAR Value. आमचे वाचक टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जागरूक आहेत त्यामुळे त्यांनी हे शब्द आधी नक्कीच ऐकले असतील. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मोबाईलची सार व्हॅल्यू किती महत्वाची आहे आणि याकडे दुर्लक्ष करणं कशाप्रकारे महागात पडू शकतं.

मोबाईल फोन्समधून निघणाऱ्या रेडिएशनचा पक्षी आणि पर्यावरणासह आपल्या आरोग्यवर देखील घातक परिणाम होतो. हे धोकादायक रेडिएशन्स फोनच्या SAR Value च्या माध्यमातून मोजले जाते. प्रत्येक मोबाईलची सार व्हॅल्यू वेगळी असते. ज्या स्मार्टफोन तुम्ही हा लेख वाचत आहात तो तुमचं किती नुकसान करत आहे हे तुम्हाला माहित आहे का? पुढे आम्ही सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या फोनची SAR Value चेक करू शकता आणि समजू शकता की फोनची सार व्हॅल्यू जाणून घेणं किती महत्वाचं आहे.

SAR Value म्हणजे काय

SAR म्हणजे Specific Absorption Rate. फोनमधून निघणाऱ्या वेव्स मानवी शरीरातील टिश्यू द्वारे शोषून घेण्याचा दर म्हणजे सार व्हॅल्यू. मोबाईलमधून निघणाऱ्या लहरी कायम एकसारख्या नसतात. जेव्हा फोनमध्ये एकाचवेळी अनेक गोष्टी सुरु असतात तेव्हा ही व्हॅल्यू वाढते तसेच फोनचा कमी वापर केल्यास या वेव्स कमी होतात. स्मार्टफोनमधून निघणाऱ्या याच वेव्स ‘SAR Value’ च्या माध्यमातून मोजल्या जातात. प्रत्येक स्मार्टफोनची वेगवेगळी रेडिएशन व फ्रिक्वेंसी असते.

>भारतात मान्य असलेली SAR Value

स्मार्टफोनची वेगवेगळी सार व्हॅल्यू असते. ही SAR Value प्रत्येक देशाच्या सरकारकडून ठरवली जाते आणि निर्धारती व्हॅल्यूपेक्षा जास्त सार व्हॅल्यू असलेले फोन्स त्या देशात बॅन केले जातात. भारत आणि अमेरिकन सरकारनं ठरवलेली सार व्हॅल्यू एक सारखी आहे. भारतात मोबाईल फोन्सची सार व्हॅल्यू जास्तीत जास्त 1.6वॉट/किलोग्राम आहे. इथे वॉट/किलोग्रामचा अर्थ असा आहे की 1 किलोग्राम टिश्यू जास्तीत जास्त 1.6 वॉट पावरच्या लहरी शोषून घेऊ शकतात.

भारतीय बाजारातील लोकप्रिय स्मार्टफोन्सची SAR Value

OnePlus 8 – 0.96W/kg

Redmi Note 9 Pro Max – 0.88W/kg

OnePlus 8 Pro – 0.96W/kg

Redmi Note 9 Pro – 0.90W/kg

iPhone SE 2020 – 1.17W/kg

Realme X3 SuperZoom – 1.19W/kg

Realme 6 Pro – 1.19W/kg

Redmi Note 8 Pro – 1.13W/kg

POCO X2 – 1.080W/kg

Xiaomi Mi 10 – 1.037W/kg

Realme Narzo 10 – 0.857W/kg

Redmi Note 8 – 0.25W/kg

Samsung Galaxy M31 – 0.383W/kg

Realme 6 – 1.138W/kg

Samsung Galaxy A31 – 1.13W/kg

अशी जाणून घ्या तुमच्या फोनची SAR Value

तुम्हाला देखील तुमच्या फोनची सार व्हॅल्यू जाणून घ्यायची असेल तर तुमच्या स्मार्टफोनवरून *#07# डायल करा. हा नंबर डायल केल्यानंतर फोनची SAR Value फोनच्या डिस्प्लेवर दिसेल. ही सार व्हॅल्यू Head SAR म्हणजे डोकं आणि Body SAR म्हणजे शरीर अशा दोन भागांमध्ये विभागली जाते. जेव्हा आपण फोनवर बोलतो तेव्हा डोकं मोबाईलच्या सर्वात जवळ असतं. त्यामुळे डोक्याची सार व्हॅल्यू वेगळी ठेवण्यात आली आहे. तसेच जेव्हा फोन खिशात किंवा हातात असतो तेव्हा व्हॅल्यू वेगळी मोजली जाते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here