Sumi Marathi Movie OTT Release: 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट’ पुरस्कार मिळवणारा ‘सुमी’ चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये न रिलीज करता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला आहे. अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रॉडक्शन निर्मित ‘सुमी’ हा चित्रपट ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर 14 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित केला जाईल.
हा चित्रपट एका महत्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची गोष्ट सांगतो. ‘सुमी’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आनंदी, मनमुराद हसणारी ‘सुमी’ दिसत आहे. ‘सुमी’ चित्रपटाला 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये फक्त ‘सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट’ हा पुरस्कार मिळालं नसून यातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर यांना ‘सर्वोत्कृष्ट बाल कलाकार’ पुरस्कार मिळाला आहे. हे देखील वाचा: Hostel Daze Season 3 असेल Raju Srivastava यांची शेवटची वेब सीरीज; जाणून घ्या कुठे होणार रिलीज
‘सुमी’मध्ये स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अजय गोगावले यांनी या चित्रपटात गाणं गायलं आहे. संगीतकार रोहन-रोहन यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. ‘या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. हर्षल कामत, स्वाती एस. शर्मा, मिहिर कुमार शर्मा हे निर्माते असून अंजली आनंद पांचाळ, जयादित्य गिरी, जयंत येवले व सोनाली जयंत हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ कथा – पटकथा संजीव झा यांची आहे. प्रसाद नामजोशी यांनी या चित्रपटाचे संवाद व गीत प्रसाद नामजोशी यांचे आहेत.
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. “’सुमी’ सारख्या विलक्षण, प्रायोगिक कथा असलेला चित्रपट जागतिक व्यासपीठास पात्र आहे. प्रेक्षकांना वेगवेगळे आशय देऊन मनोरंजन करणे आमचं कर्तव्य आहे. ‘सुमी’ ची ही गोड कहाणी सर्वांनाच आवडेल. ‘सुमी’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे”, असे अक्षय बर्दापूरकर म्हणाले आहेत. हे देखील वाचा: Kantara सारखे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ‘हे’ आहेत 5 दाक्षिणात्य चित्रपट; OTT प्लॅटफॉर्म्सवर करता येतील स्ट्रीम
दिग्दर्शक अमोल गोळे यांनी चित्रपटाविषयी सांगताना म्हटले आहे की, “’सुमी’ चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला आणि आता या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद बघून आनंद होतोय. प्लॅनेट मराठीच्या साथीने आम्ही ‘सुमी’ ला तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. एक ध्येयवेडी मुलगी म्हणजे ‘सुमी’. तुमच्या आमच्यातलीच ध्येयाचा ध्यास पूर्ण करणारी ‘सुमी’ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.’’
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
