आता तुम्ही देखील करू शकाल अंतराळात प्रवास; अशी आहे ISRO ची जबरदस्त योजना

स्‍पेस टुरिझम हे स्पेस एजन्सीजसाठी नवं क्षेत्र आहे. आतपर्यंत पृथ्वी बाहेरील जगाचा अभ्यास करण्यासाठी मानवाला कठोर प्रशिक्षण देऊन अंतराळात पाठवलं जायचं. परंतु गेल्यावर्षी जुलैमध्ये Virgin Galactic आणि Blue Origin नं स्पेस टुरिझमची सुरुवात केली. यंदा देखील एप्रिलमध्ये अमेरिकन कंपनी Axiom Space नं तीन बीजनेसमन्सना इंटरनॅशनल स्‍पेस स्‍टेशन (ISS) चा प्रवास घडवला आणि स्पेस टुरिझमची झलक दाखवून दिली. हा प्रवास खूप महागडा होता, त्यामुळे एका प्रवाश्याकडून सुमारे 420 कोटी रुपये घेण्यात आले. सध्या सेक्‍टरमध्ये नासाच्या मदतीनं Axiom Space आणि स्‍पेसएक्‍स सारख्या कंपन्या बाजारपेठ निर्माण करत आहेत. आणि आता भारत देखील अंतराळ पर्यटनाच्या क्षेत्रात उतरणार असल्याची बातमी आली आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी ही माहिती देत सांगितले की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत म्हणजे लो अर्थ ऑर्बिटमध्ये स्‍पेस टुरिझमसाठी स्वदेशी क्षमता डेव्हलप करत आहे. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तरं देताना सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, राष्ट्रीय अंतराळ प्रोत्साहन आणि प्राधिकरण केंद्र (IN-SPACE) नं अवकाश पर्यटनाच्या समावेशासह या उपक्रमांमध्ये खाजगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अंतराळ मुत्सद्देगिरीवरील प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, इस्रोनं अंतराळ घडामोडींच्या विविध क्षेत्रात 61 देशांशी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संबंध पुढे नेले आहेत.

‘इन-स्पेस’ ही एक अंतराळ विभागांतर्गत एक अंतराळ क्षेत्रात प्रायव्हेट सेक्‍टरच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणारी एक सिंगल विंडो एजेंसी आहे. अजून एका प्रश्नाचे उत्तर देताना जितेंद्र सिंह यांनी म्हटलं की, अंतराळ विभाग एक सर्वसमावेशक व्यापक इंटीग्रेटेड स्‍पेस धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे, जे खाजगी अवकाश उद्योगाच्या प्रयत्नांना मार्गदर्शन करेल.

जागतिक स्पर्धा

सर्वसामान्य नागरिकांना अंतराळाची सफर घडवून आणण्याच्या बाबतीत भारताला जागतिक स्थरावरून देखील स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. आतापर्यंत 3 अंतराळ कंपन्यांना यात यश मिळालं आहे. यात रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन गॅलेक्टिक, जेफ बेजोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन व इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या 3 कंपन्यांचा समावेश आहे. फक्त खाजगी कंपन्या आणि अब्जाधीश नव्हे तर चीनसह अनेक देशांनी देखील अंतराळ पर्यटन क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे.

मिशन गगनयान

भारताच्या मिशन गगनयान (Gaganyaan) च्या माध्यमातून भारत प्रथमच मानवाला अंतराळात पाठवण्यात येईल. पुढील वर्षी हे मिशन पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे. एका प्रेस कॉन्‍फ्रेंसमध्ये जितेंद्र सिंह यांनी सांगितलं होतं की, पुढील वर्षी भारतीय वंशाचे एक किंवा दोन लोक अंतराळात जातील. यासाठी चालू वर्षाच्या अखेरपर्यंत ट्रायल्स पूर्ण करण्यात येतील.

यावर्षीच्या अखेरपर्यंत दोन चाचण्या करण्यात येतील. पहिल्या चाचणीत मनुष्यविरहित यान पाठवलं जाईल. तर चाचणी एक महिला रोबोट पाठवून केली जाईल. या रोबोटला व्योमित्र असं नाव देखील देण्यात आलं आहे. या चाचण्यांच्या यशावर भारतीय अंतराळ प्रवासाचं भविष्य अवलंबुन असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here