
प्रॉपर्टी टॅक्स (मिळकत कर) हा वार्षिक कर आहे जो मालमत्ता धारकांना स्थानिक नागरिक संस्थेला द्यावा लागतो. या कराच्या पैशातून नागरी संस्था मूलभूत सुविधा उभारल्या जातात. आता काही शहरांमधील महानगरपालिकांचा वार्षिक मालमत्ता कर भरण्याची तारीख जवळ आली आहे. हा कर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन देखील भरू शकता. इथे आम्ही तुम्हाला पुणे, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगर पालिकांचे प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाइन कसे भरावे हे सांगणार आहोत.
पुणे मालमत्ता कर ऑनलाइन पेमेंट
PMC मालमत्ता कर बिल आणि पेमेंट अगदी सहज ऑनलाइन करता येतं. विशेष म्हणजे PMC मालमत्ता कराचे ऑनलाइन पेमेंट केल्यास तुम्हाला 2% सूट देखील मिळते. यासाठी तुम्हाला https://propertytax.punecorporation.org/OnlinePay/PROP_DUES_DETAILS.aspx या वेबसाइटवर जावं लागेल. तिथे तुम्हाला ज्या मालमत्तेचा कर भरायचा आहे त्याची माहिती द्यावी लागेल. तसेच तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील मागितले जातील ते भरल्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय किंवा अन्य माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करू शकता. याच वेबसाइटवर तुम्हाला तुमची रिसिप्ट देखील मिळेल.
मुंबई मालमत्ता कर ऑनलाइन पेमेंट
तुम्ही portal.mcgm.gov.in वर एमसीजीएम (MCGM) पोर्टल वापरून मुंबईला मालमत्ता कर ऑनलाइन भरू शकता. इथे जाऊन तुमचा खाते क्रमांक सबमिट करा. तुम्ही थकबाकी असलेली एमसीजीएम (MCGM) मालमत्ता कर बिले तपासू शकता किंवा थेट एमसीजीएम (MCGM) मालमत्ता कर ऑनलाइन भरू शकता. इथूनच तुम्हाला भरणा पावती म्हणजे पेमेंट रिसिप्ट मिळते, ती जपून ठेवा.
ठाणे मालमत्ता कर ऑनलाइन पेमेंट
ठाणे मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यासाठी ठाणे महापालिकेचे अधिकृत पोर्टल https://propertytax.thanecity.gov.in/ आहे. जे मराठी किंवा इंग्रजी भाषेत वापरता येतं. इथे जाऊन मालमत्ता क्रमांक किंवा मालकाच्या नावाने तुमची मालमत्ता शोधा. लक्षात असू दे तुमचा मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यासाठी TMC च्या वेबसाइटवर तुमची नोंदणी करणे आवश्यक आहे. पोर्टलवर नोंदणी करून तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI सारख्या माध्यमातून मालमत्ता कर भरू शकता.
नवी मुंबई मालमत्ता कर ऑनलाइन पेमेंट
नवी मुंबईचा मालमत्ता कर भरण्यासाठी NMMC ची अधिकृत वेबसाइट https://www.nmmc.gov.in/property-tax2 अशी आहे. इथे तुम्हाला लॉग इन करावं लागेल. त्यानंतर ‘प्रॉपर्टी टॅक्स’ चा पर्याय निवडून ‘मालमत्ता कोड’ टाका आणि ‘सर्च’ वर क्लिक करा. तुमच्या समोर मालकाचे नाव, दंड आणि थकबाकीची रक्कम येईल. ‘पे ऑनलाइन’ वर क्लिक केल्यावर पेमेंट पेज ओपन होईल. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय, NEFT/RTGS इत्यादींमधून NMMC मालमत्ता कर भरू शकता.














