सूर्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात हालचाली पाहायला मिळत आहेत. 15 जुलै रोजी सूर्यावर ज्वालांचा मोठा स्फोट झाला असून याचा परिणाम पृथ्वीवरही झाला. 19 जुलै रोजी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये एक छिद्र पडलं. या छिद्रातून सौर वादळ पृथ्वीवर आदळलं होतं. अशा अनेक रिपोर्ट्समधून आपण सूर्यावरील हालचालींची माहिती मिळत आहे. यामुळे सोलर फ्लेयर्स आणि कोरोनल मास इजेक्शन (CME) सारख्या घटना घडत आहे. आपला सूर्य सध्या 11 वर्षांच चक्र पूर्ण करत आहे आणि सध्या जास्त सक्रिय टप्प्यात आहे.
अलीकडेच अमेरिकी अंतराळ एजेंसी Nasa नं एक चेतावणी देत सांगितलं होतं की प्रचंड सौर स्फोट वारंवार होण्याची शक्यता आहे. हे स्फोट आणि यातील वाढ 2025 पर्यंत सुरु राहील. याचा परिणाम सॅटेलाईट्स आणि अंतराळवीरांवर पडू शकतो. हे डिसेंबर 2019 मध्ये सुरु झालेलं सोलर सायकल 25 आहे. नासानुसार, साल 2025 मध्ये आपण सूर्याच्या 11 वर्षांच्या सौर चक्राच्या सर्वोच्च बिंदूवर असू ज्याला सोलर मॅक्सिमम देखील म्हटलं जातं. यामुळे कोरोनल मास इजेक्शन (CME) आणि सोलर फ्लेयर्सची शक्यता जास्त वाढेल.
मिळालेल्या माहितीनुसार, दर 11 वर्षांनी एक नवीन सौर चक्र सुरु होते. या काळात सूर्य आगीच्या एका शांत गोळ्यावरून सक्रिय आणि वादळी गोळ्यात रूपांतरित होतो आणि पुन्हा शांत होतो. या काळात सूर्याकडून पृथ्वीच्या दिशेने कोरोनल मास इजेक्शन आणि सोलर फ्लेयर्स उत्सर्जित होतात. यामुळे पृथ्वीवर भूचुंबकीय वादळं येतात आणि सॅटेलाईट्स व पृथ्वीवरील पावर ग्रिडवर याचा परिणाम होऊ शकतो.
CME म्हणजे काय
CME म्हणजे सौर प्लाज्माचे मोठे वादळ. सौर स्फोट झाल्यावर हे वादळ अंतराळात सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात पसरतात. अंतराळात प्रवास करत असल्यामुळे यांचा विस्तार होतो आणि बऱ्याचदा हे लाखो मैलाचा प्रवास करतात. अनेकदा तर हे ग्रहांच्या चुंबकीय क्षेत्राला जाऊन धडकतात. जेव्हा हे पृथ्वीच्या दिशेने येतात तेव्हा हे जियो मैग्नेटिक म्हणजे भूचुंबकीय बिघाड निर्माण करतात. त्यामुळे सॅटेलाईट्समध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकतं आणि पावर ग्रिडवर देखील परिणाम होऊ शकतो. याचा जास्त परिणाम झाल्यास पृथ्वीच्या कक्षेत असलेले अंतराळवीर धोक्यात येऊ शकतात.
जेव्हा सूर्याची चुंबकीय ऊर्जा प्रक्षेपित होते तेव्हा त्यातून निघणाऱ्या प्रकाश आणि कणांपासून सोलर फ्लेयर्स बनतात. आपल्या सौर मंडळातील या फ्लेयर्स आतापर्यंतचा सर्वात शक्तीशाली स्फोट आहेत. ज्यातून अब्जावधी हायड्रोजन बॉम्ब इतकी ऊर्जा बाहेर पडते. यामुळे रेडिओ ब्लॅकआऊट होऊन याचा परिणाम मोबाईल, जीपीएस सेवांवर होण्याची शक्यता असते.














