ऑनलाईन फ्रॉड करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आता त्यात मोबाईल टॉवर उभारणीच्या स्कॅमची भर पडली आहे. सध्या 5G ची चर्चा जोरदार असल्यामुळे सायबर गुन्हेगार 5G टॉवरसाठी जमीन हवी असल्याचं सांगून लोकांना फसवत आहे. दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदातांची प्रमुख प्रतिनिधी संस्था आणि दूरसंचार सेवा प्रदाता अनुक्रमे डीआयपीए व सीओएआय यांचे प्रतिनिधित्व असलेल्या दूरसंचार उद्योगाने जनतेला त्यांच्या प्रॉपर्टींमध्ये मोबाइल टॉवर्स उभारण्यासंबंधित होणार्या फसवणूकीबाबत सावध केले आहे.
जनतेची फसवणूक करण्यासोबत त्यांना मोबाइल टॉवर्स बसवण्याकरिता त्यांची जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी सरकारी कराच्या नावावर स्वत:च्या वैयक्तिक किंवा कंपनीच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगणार्या विशिष्ट कंपन्या, एजन्सीज किंवा व्यक्तींविरुद्ध जनतेला सावध करण्यात आले आहे. हेच लोक मोबाइल टॉवर्स बसवण्यासाठी दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देखील देत आहेत.
मोबाइल टॉवर्स टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडर्स (टीएसपी) किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स (आयपी) द्वारे स्थापित केले जातात. टॉवर स्थापनेसाठी कोणत्याही ऑफर स्वीकारण्यापूर्वी लोकांना टीएसपी किंवा आयपीच्या वेबसाइट्सना भेट देऊन सत्यता पडताळण्याची विनंती करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त टीएसपी आणि आयपीची अद्ययावत यादी www.dot.gov.in वर देखील उपलब्ध आहे.
डीआयपीएचे डीजी श्री. टी. आर. दुआ म्हणाले, ”इंडस टॉवर्स, अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशन, सुमित डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, असेंड टेलिकॉम, टॉवर व्हिजन अशा टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रदातांकडून मोबाइल टॉवर्स स्थापित केले जातात. आयपी जनतेला फसवणूकींबाबत सावध करण्यासाठी अनेक पावले उचलत आहेत आणि टोल-फ्री क्रमांक, वेबसाइट, ई-मेल इत्यादी सारख्या विविध माध्यमांच्या माध्यमातून संभाव्य ठिकाणांबाबत माहिती गोळा करण्यासाठी विविध पद्धती सादर केल्या आहेत. याव्यतिरिक्त एक जबाबदार संस्था म्हणून डीआयपीए टॉवरच्या फसवणुकीबद्दल जनतेला सावध करण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक सूचना देखील प्रकाशित करत आहे.”
”अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी, विविध महत्त्वपूर्ण सेवांना पाठिंबा देण्यासाठी आणि राज्यांमध्ये दळणवळण राखण्यासाठी मोबाइल टॉवर्स अत्यंत आवश्यक आहेत. मोबाइल टॉवरशी संबंधित फसवणुकीमुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एक मजबूत संप्रेषण नेटवर्क तयार करण्याप्रती प्रत्यक्ष काम करणार्या टीम कर्मचार्यांमध्ये विश्वासाची कमतरता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. दूरसंचार उद्योग ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणून, आवश्यक मजबूत पायाभूत सुविधा सादर करण्यासाठी आम्ही डीआयपीएसोबत सहयोग केला आहे. तसेच, ग्राहकांना या फसव्या पद्धतींबद्दल माहिती आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही विविध व्यासपीठांवर सूचना जारी करत आहोत,” असे सीओएआयचे डीजी लेफ्टनंट कर्नल डॉ. एस. पी. कोछर म्हणाले.















