गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) हा मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज झाला होता. हा चित्रपट 2008 साली आलेल्या ‘दे धक्का’ या लोकप्रिय चित्रपटाचा दुसरा भाग आहे. थिएटर गाजवाल्यांनंतर आता हा कॉमेडी चित्रपट ओटीटीवरील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दे धक्का 2 भारतातील लोकप्रिय ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झी5 च्या माध्यमातून डिजिटली रिलीज केला जाईल.
‘दे धक्का 2’ या चित्रपटानं चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर टीव्हीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर केलं होतं. आणि आता ‘दे धक्का 2’ हा सिनेमा झी5 वर सिनेरसिकांना 13 जानेवारी 2023 पासून स्ट्रीम करता येईल. हा चित्रपट पाहण्यासाठी तुमच्याकडे झी5 चं सब्सस्क्रिप्शन असणं आवश्यक असेल, त्याशिवाय तुम्ही हा चित्रपट ऑनलाइन पाहू शकणार नाही.
दे धक्का 2 चित्रपटाची गोष्ट
‘दे धक्का 2’ च्या माध्यमातून चाहत्यांना आता पुन्हा एकदा त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव आणि त्याच्या कुटुंबियांना पाहण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या भागातील सुमती जाधव, धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसन या पात्रांना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे.
पहिल्या दे धक्कामध्ये या कुटुंबीयांची धमाल ट्रीप मुंबई ते कोल्हापूर अशी होते. परंतु यावेळी प्रकरण देशाबाहेर गेलं आहे. आता जाधव कुटुंबियांना कोल्हापूरवरून थेट लंडनला जाणार आहेत. या सिनेमाच्या पोस्टर, टीझर, ट्रेलरने प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता वाढवली आहे. लंडनची झलक या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मनोरंजनाचा नवा डोस हा सिनेप्रेमींना मिळणार आहे.
दे धक्का 2 मधील कलाकार
या चित्रपटाचं लेखन प्रताप फड यांनी केलं आहे तर दिग्दर्शनाची जबाबदारी महेश मांजरेकर आणि सुदेश मांजेरकर यांनी मिळून पार पाडली आहे. दे धक्का 2 ला अजून लोबोनं संगीत दिलं आहे तर चित्रीकरण कारण रावत यांनी केलं आहे. चित्रपटाच्या एडिटिंगची जबाबदारी सतीश पडवळ यांनी पार पाडली आहे.
पहिल्या भागाप्रमाणे या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, सक्षम कुलकर्णी आणि मेधा मांजरेकर प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर संजय खापरे, प्रवीण तरडे, भरती आचरेकर, आनंद इंगळे आणि विद्याधर जोशी देखील दिसतील. दुसऱ्या भागात सायली जाधवची भूमिका मात्र पांघरून फेम गौरी इंगवलेला देण्यात आली आहे.
काही मराठी सिनेमे सिनेरसिक कितीही वेळा आवडीने पाहतात. या यादीत दे धक्का या सिनेमाचा समावेश आहे. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दे धक्का 2 हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली. सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्डदेखील झळकले होते. दे धक्का 2 मधील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.