OIS म्हणजे काय आणि स्पष्ट फोटो काढण्यासाठी कसा होतो ह्याचा फायदा? जाणून घ्या

मोबाइल टेक्नॉलॉजीचे रोज नवनवीन शब्द कानी पडत असतात. खासकरून कॅमेरा टेक्नॉलॉजीचे तर कित्येक शब्द आपल्या डोक्यावरून जातात. मेगापिक्सल, सेन्सर, अपर्चर, शटर स्पीड, वाइड अँगल, मॅक्रो, नाइट मोड आणि असे अनेक शब्दांचा भडीमार केला जातो. अलीकडे एक शब्द सर्वात जास्त कानावर पडत आहे तो म्हणजे OIS आणि Image Stabilisation (इमेज स्टॅबिलायजेशन). परंतु तुम्हाला माहित आहे का ही कोणती टेक्नॉलॉजी आहे आणि OIS म्हणजे काय? किंवा ओआयएसचं काम काय. चला तर थोडक्यात जाणून घेऊया ह्या महत्वाच्या टेक्नॉलॉजी बद्दल.

OIS म्हणजे काय?

फोटोग्राफी करताना जरासा हात हलला की इमेज खराब होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर ब्लर (धूसर) होतो. आणि मोबाइल फोटोग्राफीमध्ये फोन हातात ठेऊन पिक्चर क्लिक करतात त्यामुळे तिथे ही समस्या सर्वाधिक येते. ट्रायपॉडच्या तुलनेत हात जास्त हलतो. रात्री किंवा झूमचा वापर केल्यास ही समस्या वाढते. अशावेळी OIS एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी हात हलल्यावर देखील स्पष्ट इमेज व व्हिडीओ बनवण्यास मदत करते. ह्यामुळे स्टॅबिलायजेशन म्हणजे स्थिरता कायम राहते.

आता बोलूया ओआयएस टेक्नॉलॉजी बद्दल, OIS चा फुलफॉर्म ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (Optical Image Stabilisation). हार्डवेयर आधारित ही कॅमेऱ्यातील एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी नकळत कॅमेरा हलल्यावर स्वतः हलून त्या हालचालीला अ‍ॅडजस्ट करते. तुम्हाला वाटत असेल की खरंच कॅमेरा देखील हलतो का. हो OIS असलेल्या कॅमेऱ्यात हे फंक्शन असतं त्यामुळे बारिकसुरीक झटके हालचालीने अ‍ॅडजस्ट केले जातात.

OIS मुळे फोटोग्राफी कशी सुधारते

हीच सर्वाधिक फायदा तुम्हाला रात्री होतो. तुम्हाला माहित असेलच की फोटोग्राफी म्हणजे प्रकाशाचा खेळ आहे. रात्री प्रकाश कमी असतो आणि पिक्चर क्लिक केल्यावर प्रकाश कॅप्चर करण्यास थोडा जास्त वेळ लागतो. परंतु एवढ्या कालावधीत हात हलतो. तेव्हा OIS हाताची ही हालचाल अ‍ॅडजस्ट करून चांगले फोटो देते.

OIS मध्ये एक छोटा जायरोस्कोप असतो जो हाताची हालचाल डिटेक्ट करून विरुद्ध दिशेला कॅमेरा घेऊन जातो. ह्यात एक अ‍ॅक्टूवेटर्स म्हणजे मोटर असते जी रियल टाइम हाताची हालचाल डिटक्ट करते आणि त्यानुसार कॅमेरा अ‍ॅडजस्ट करते. जर तुमचा हात चुकून खाली झाला तर कॅमेरा वरच सब्जेक्टवर राहील आणि जर हात उजवीकडे गेला तर कॅमेरा डावीकडे जातो. अशाप्रकारे OIS मुळे इमेज व व्हिडीओ खूप स्टेबल होतात.

ओआयएसची क्षमता प्लस/मायनसच्या माध्यमातून मोजली जाते. उदाहरणार्थ एखादं ओआयएस 17 डिग्री किंवा 20 डिग्री +/— स्टॅबिलायजेशन अ‍ॅडजस्ट करू शकतं. फोननुसार क्षमता वेगळी असते, परंतु एवढं मात्र नक्की की OIS छोटीमोठी हालचाल अ‍ॅडजस्ट करतं हेव्ही नाही.

OIS आणि EIS मधील फरक

OIS चा अर्थ Optical Image Stabilisation असा आहे जी एक हार्डवेयर बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. फोनमध्ये ओआयएससाठी वेगळे घटक असतात जे इमेज व व्हिडीओ स्टेबल करतात.

तर EIS म्हणजे electronic image stabilisation जी सॉफ्टवेयर आधारित टेक्नॉलॉजी आहे. फोन कंपन्या हार्डवेयर नव्हते तर सॉफ्टवेयरच्या मदतीनं पिक्चर स्टेबल करण्याचा प्रयत्न करतात. दोन्हींची तुलना केल्यास OIS बेस्ट म्हणता येईल. ह्याच कारणांमुळे ही टेक्नॉलॉजी जास्त चर्चेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here