5G नंतर बंद होणार का 4G सर्व्हिस? 3G आणि 2G चं काय होणार?

भारतात 5G सर्व्हिस येण्यासाठी आता फक्त काही महिने शिल्लक राहिले आहेत. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल. एकदा का 5G सर्व्हिस सुरु झाली की हळूहळू संपूर्ण देशात या सेवेचा विस्तार होईल. सध्या या नव्या आणि वेगवान सर्व्हिसबाबत अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. जसे की, प्लॅन्सची किंमत किती असेल, सिम कसं मिळेल आणि कधी आणि कुठे सुरुवात होईल. परंतु यापेक्षा वेगळा अजून एक मोठा मजेशीर प्रश्न निर्माण होतो की जेव्हा भारतात 5G सर्व्हिस येईल तेव्हा 4G चं काय होईल? 4G सर्व्हिस बंद होणार की सुरु राहणार? 3G सर्व्हिसचं काय झालं? चला याचं उत्तर जाणून घेऊया.

4G आल्यानंतर 3G कुठे गेलं?

आज ज्याप्रकारे 5G ची चर्च आहे तसेची एकेकाळी 4G सर्व्हिसची देखील चर्चा केली जात होती आणि त्याआधी 3G साठी देखील लोक वेडे झाले होते. परंतु 4G सर्व्हिस आल्यावर 3G चं काय झालं? कुठे गेले 3G फोन? भारतात सध्या कुठे 3G सर्व्हिस आहे आणि हिचा वापर कोण करत आहे? असे अनेक प्रश्न समोर येतात. थोडक्यात सांगायचं तर खाजगी क्षेत्रात 3G सर्व्हिसचा शेवट झाला आहे. Airtel, Vodafone-Idea सारख्या प्रायव्हेट कंपन्यांनी आपली 3G सर्व्हिस बंद केली आहे. जियोकडे तर 3G सर्व्हिस कधीच नव्हती, कंपनीनं 4G द्वारे भारतात पाऊल टाकले होते.

भारतात 3G सर्व्हिस सध्या सरकारी कंपनी BSNL कडेच आहे. टेलीकॉम सेवेसाठी देशात एकूण 22 सर्कल आहेत यातील दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त इतर सर्व सर्कल्समध्ये BSNL ची सेवा मिळते यात कंपनी 3G सर्व्हिस देते. त्यामुळे जर तुम्ही 3G सर्व्हिसवर शिफ्ट होऊ इच्छित असाल तर तुम्ही BSNL चं सिम घेऊ शकता आणि तुमच्या 4G मोबाईलमध्ये ही सर्व्हिस वापरता देखील येईल.

प्रायव्हेट कंपन्यांबाबत बोलायचं झालं तर Airtel नं 2019 मध्ये 3G सर्व्हिस बंद करण्याची घोषणा केली होती. तर 2021 पर्यंत Vodafone-Idea ची 3G सर्व्हिस पूर्णपणे बंद झाली. कंपन्यांनी एकाच वेळी ही सर्व्हिस पूर्णपणे बंद केली नाही तर हळूहळू बंद करण्यात आली. 4G वर शिफ्ट होण्याची सूचना आधी ग्राहकांना देण्यात आली होती. त्यानंतर कंपन्यांनी ही सर्व्हिस पूर्णपणे बंद केली, कारण 2G आणि 4G सह त्यांना नेटवर्कवर अतिरिक्त भार द्यायचा नव्हता आणि 3G चे सब्सक्रायबर देखील जास्त नव्हते. आज भारतात कोणत्याही खाजगी मोबाईल सेवा प्रदाता कंपनीकडे 3G सर्व्हिस नाही आणि सर्व्हिस नसल्यामुळे 3G फोन देखील बाजारात येणं बंद झालं.

5G नंतर 4G चं काय होणार?

3G ची परिस्थती आपण जाणून घेतली आणि आता 4G बद्दल जाणून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर 4G सर्व्हिस सध्या तरी कुठेच जाणार नाही. सध्यातरी ही सेवा बंद केली जाणार नाही, कारण 5G सर्व्हिस येण्यास व तिचा विस्तार होण्यास खूप वेळ जाईल. 5G चा लिलाव अजूनही सुरु आहे, तसेच लाँचला देखील वेळ आहे. लाँच झाल्यावर देखील 4G प्रमाणे संपूर्ण देशात नवीन सेवा उपलब्ध होणार नाही. ही हळूहळू सादर केली जाईल, छोट्या गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये तर 5G येण्यास 2-3 वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. किंवा कदाचित तिथे 5G पोहोचणार देखील नाही.

4G सर्व्हिसचा वेगानं प्रसार होण्यामागे Jio चा हात आहे. अन्यथा ही सर्व्हिस देखील हळूहळू भारतात पसरली असती. Airtel नं आपली 4G सर्व्हिस 2014 मध्ये लाँच केली होती. त्यानंतर Vodafone ची एंट्री झाली होती. परंतु 2016 पर्यंत देखील यांची सर्व्हिस काही निवडक शहरांपर्यंत मर्यादित होती आणि त्यातही अनेकांना याची माहिती नव्हती. परंतु 2016 मध्ये जियोनं संपूर्ण भारतात फ्री सर्व्हिस देत आपलं 4G नेटवर्क रोलआउट केलं आणि युजर्सना 4G च्या शक्तीची जाणीव झाली. स्टोर्सवर लांबच्या लांब रांगा लागल्या आणि Jio सिमसाठी वेटिंग सुरु झालं. त्यामुळे Airtel आणि Vodafone-Idea सारख्या कंपन्यांना देखील कमी किंमतीत आपली 4G सर्व्हिस संपूर्ण भारतात सुरु करावी लागली.

परंतु यावेळी Jio सह इतर कोणतीही कंपनी एवढी मोठी जोखिम उचलणार नाही. कोणतीही कंपनी संपूर्ण देशात एकाचवेळी 5G सर्व्हिस लाँच करणार नाही. तसेच 5G सर्व्हिस महाग देखील असेल आणि सुरुवातीला सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असेल. त्यामुळे सध्या तरी 4G सर्व्हिस बंद होणार नाही. दोन-तीन वर्षांच्या कालावधीत 5G चे युजर्स आले आणि लोकांच्या हातात 5G फोन्स येऊ लागले की जुनी सर्व्हिस बंद करण्याचा विचार केला जाऊ शकतो जसं 3G सर्व्हिस सोबत झालं आहे. त्यामुळे 4G सर्व्हिस अजून काही काळ नक्कीच भारतात उपलब्ध असेल.

2G सर्व्हिस होणार नाही बंद

विशेष म्हणजे 3G बंद झालं, 4G सर्व्हिस बंद करण्याबाबत आपण आतापासून चर्चा करत आहोत आणि 5G बाबत देखील काही वर्षांनी हा प्रश्न निर्माण होईल परंतु भारतात 2G सर्व्हिस लाॅन्च होऊन 25 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे आणि आगामी काळात देखील ही सर्व्हिस सुरु राहील. ही सर्व्हिस बंद होणार नाही कारण भारतात आजही फीचर फोन युजर्सची संख्या खूप जास्त आहे. या युजर्समुळे कंपन्यांना महसूल जरी कमी मिळत असला तरी आकडे दाखवण्यासाठी यांचा वापर करता येतो म्हणून कोणतीही टेलिकॉम कंपनी या युजर्सना सोडणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here