रिलायन्सनं काल आपल्या 45व्या अॅन्युअल जनरल मीटिंग (RIL AGM 2022) मध्ये बहुप्रतीक्षित 5G सेवेच्या लाँचची घोषणा केली, जियोची 5G सेवा दिवाळीत सुरु होईल. त्याचबरोबर जियो प्लॅटफॉर्मचे प्रमुख आकाश अंबानींनी नवीन वायरलेस हाय स्पीड इंटरनेट डिवाइस Jio AirFiber देखील सादर केलं आहे. Jio AirFiber पूर्णपणे वायरलेस असेल, ज्याचा वापर घर, ऑफिस आणि कुठेही करता येईल. जियो एअरफायबर सादर करत आकाश अंबानींनी सांगितलं की या डिवाइसला फक्त विजेची आवश्यकता असेल आणि तुमचं 5G वाय-फाय हॉटस्पॉट तयार होईल. Jio AirFiber कंपनीच्या 5G सर्व्हिसवर आधारित आहे, जी हाय-स्पीड इंटरनेट ऑफर करते.
Jio AirFiber ची खासियत
Jio AirFiber एक प्रकारची वायरलेस इंटरनेट सर्व्हिस आहे म्हणजे इंटरनेट कनेक्शनसाठी तुमच्या घरात कोणतीही वायर येणार नाही. हा डिवाइस तुम्हाला तुमच्या घरच्या विजेच्या सॉकेटमध्ये प्लग करताच इंटरनेट सक्रिय होईल. या डिवाइसचा वापर कुठेही करता येईल. हा डिवाइस एक प्रकारचा हॉटस्पॉट आहे जो अल्ट्रा फास्ट 5G इंटरनेट स्पीड देईल. म्हणजे हा जियोचा 5G हॉटस्पॉट आहे.
Jio AirFiber मुळे काय बदलेल
Jio AirFiber अल्ट्रा हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन ऑफर करेल. याच्या मदतीनं लाइव्ह कंटेंट, क्लाउड गेमिंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन शॉपिंग सर्व्हिसेज फास्ट इंटरनेटसह अॅक्सेस करता येतील. Jio AirFiber सादर करताना आकाश अंबानींनी सांगितलं की यामुळे पारंपरिक ब्रॉडबँडची पद्धत पूर्णपणे बदलेल.
समजा जर तुम्ही एखादी क्रिकेट मॅच लाइव्ह बघत असाल तर आतापर्यंत तुम्ही एकाच अँगलनं मॅच बघू शकता. परंतु जियो एअरफायबरच्या मदतीनं तुम्ही हाय क्वॉलिटीसह वेगवेगळ्या अँगलनं सामन्याचा आनंद घेऊ शकता. म्हणजे तुम्ही मल्टीपल व्हिडीओ एकाच वेळी स्ट्रीम करू शकता. तसेच तुम्ही लाइव्ह मॅचसह तुमच्या मित्रांशी व्हिडीओ चॅट देखील करू शकाल.
त्याचबरोबर जियो एअरफायबरवर अल्ट्रा-लो लेटेंसी मिळते जी युजरला नेक्स्ट लेव्हल गेमिंग एक्सपीरियंस ऑफर करते. जर तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर गेमिंग करायला आवडत असेल तर Jio AirFiber तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. आकाश अंबानींनी अपेक्षा व्यक्त केली की 5G सेवेमुळे भारतात कनेक्टेड डिवाइसची संख्या एका वर्षात 800 मिलियनवरून 1.5 बिलियन होऊ शकते. यात Jio AirFiber ची भूमिका महत्वाची असेल.
Jio 5G कधी होणार सुरु
Jio 5G ची सुरुवात दिवाळीला होईल. रिलायन्स ग्रुपचे चेयरमन मुकेश अंबानींनी कंपनीच्या एजीएममध्ये सांगितलं की जियोची 5G सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दिवाळीत सुरु होईल. तर संपूर्ण भारतभर जियोची 5G सर्व्हिस डिसेंबर 2023 पर्यंत पोहोचेल.
जियोचं फायबर नेटवर्क
रिलायन्सच्या 45व्या एजीएममध्ये मुकेश अंबानींनी सांगितलं की जियोचं फायबर ऑप्टिक नेटवर्क 11 लाख किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तसेच भारतात प्रत्येक तीन पैकी दोन नवीन युजर्स जियो फायबर सर्व्हिसची निवड करत आहेत. मुकेश अंबानी यांच्या मते फिक्स्ड ब्रॉडबँडच्या बाबतीत भारत सध्या 2 कोटी पेक्षा जास्त कनेक्शंससह जगात 138 व्या क्रमांकावर आहे. जियो 5G मुळे यात बदल होऊ शकतो.